सिल्लोड, (प्रतिनिधी) ; छत्रपती संभाजीनगर जळगाव क्ष महामार्गावर अजिंठा घाटात रात्री झालेल्या अपघातात ट्रकचालक जागीच ठार झाला. जळगावकडून आंध्रप्रदेशकडे जाणारा ट्रकचा (एपी १६ टीजे ४६६६) चालक व्हीएम कुमार मामलीपल्ली (४९, रा. नेहरूनगर, जिल्हा गुंटूर, राज्य आंध्र प्रदेश) हा गाडीखाली दबून जागीच ठार झाला.
यावेळी अजिंठा घाटात वाहतूककोंडी झाली. परंतु कर्मचाऱ्यांनी ताबडतोब दोन्ही बाजूने ट्रॅफिक मोकळी करून घाट वाहतुकीस सुरळीत केला. खासदार रक्षा खडसे या ट्रॅफिक कोंडीत अडकल्या. चार वेळेस वाहतूक कोंडीत अडकल्याचे त्यांनी सांगितले.
अजिंठा घाटाचा प्रश्न हिवाळी अधिवेशनात मांडला. परंतु वनविभागाच्या अटींमुळे रस्ता रुंदीकरणासाठी अडचणी येत असल्याचे सांगितले. जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला भेट देण्यास येणाऱ्या देशी व विदेशी पर्यटकांना वाहतूक कोंडीचा नेहमीच सामना करावा लागत आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली आहे. या घाटाचा लवकर प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी पर्यटकांसह वाहनधारकांनी केली आहे.















